सारे प्रवासी घडीचे

pages: 
160
price: 
150 रु.
Edition: 
बारावी
Cover Page: 

‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्य्र.’’


अशा दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारायला घेतला आहे. आणि एक मोठा कलात्मक चमत्कार म्हणजे या नापीक प्रदेशातून खळाळत्या प्रसन्न हास्याचे सोळा आणे पीक काढले आहे!


तर्‍हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये दळवींनी उलगडीत नेला आहे. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर, आणि स्थितप्रज्ञ दारू-दुकानदार अंतोन पेस्तांव, गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकलबोर्डात निवडून आलेला ‘बिचारा’ केशा चांभार, परस्परांशी तहाहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावतारवाला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक... एक की दोन - किती नावे सांगावी? शिवाय ही माणसे सुटेपणाने येत नाहीत. रवळनाथाच देऊळ आणि त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, दारूचे छप्पर, रविवारचा बाजार, मोटार सर्विस, होळीचा सण, गंगू भाविणीचे घर यांसारखी स्थळे आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे. अगदी स्वाभाविक वातावरणात निःशंकपणे, आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणारी ही माणसे आहेत. त्यामुळे उपरा विदूषकीपणा त्यांना चिकटवण्याची गरजच लेखकाला पडत नाही. पडत नाही. ‘‘अशी एक एक माणसे ! जगावेगळी जगली, जगावेगळी मेली ! भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली.’’


या चित्रांना विशेष गहिरेपणा येतो तो आणखी एका कारणामुळे : एका इतिहासजमा समाजरचनेत वावरून गेलेली ही माणसे यापुढे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत ! काळाच्या ओघात गावाची जुनी घडी विस्कटली आणि नवी आली, पण लेखकाचा पिंड वाढलेला आहे त्या जुन्या परंपरेत. त्या मावळत्या परंपरेच्या पडझडीचे उदास पडसाद विनोदाच्या खळखळाटांतूनही दळवींनी वाचकाला ऐकवले आहेत - त्यांची नेहमीची सफाईदार, सहज शैलीही इथे अंतर्मुख होते.


म्हटले तर हे आपूचे आत्मचरित्र आहे. म्हटले तर व्यक्तिचित्रे आहेत, म्हटले तर विनोदी गप्पागोष्टी आहेत, म्हटले तर कादंबरी आहे - काहीही असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे, आणि हसवता हसवता खिन्न करणारे हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे.

Average (2 votes):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )