जीवनाचं गूढ ज्यांना उकललं आणि ज्यांनी स्वानुभूतीतून ते जाणलं अशा संतस्वरूप व्यक्तित्वांपैकी एक – श्री दादाजी गावंड! जीवनाविषयीचे गहन सत्य, त्याचा गूढ अर्थ आणि त्याविषयीची आपली अंतर्दृष्टी दादाजींनी या पुस्तकातून व्यक्त केली आहे. विविध भाषा, व्यवसाय, विविध प्रकारचे राहणीमान असणार्या समाजातील अनेक व्यक्तींनी दादाजींशी याविषयी चर्चा केल्या. त्यातील एक साधक, एक गृहस्थ, एक स्त्री, श्रीमंत व्यक्ती, संशोधक, कलावंत, मानसोपचारतज्ज्ञ, आणि ध्यानी अशा आठ प्रतिनिधिक भूमिकांशी झालेल्या संभाषणांचे संकलन या पुस्तकात केले आहे.
स्वनिर्मित तत्वज्ञानाने भारभूत झालेले सुशिक्षित मन आणि त्याचे स्वकेंद्रित व्यवहार हे जीवनाचे सत्यस्वरूप जाणून घ्यायच्या अंतर्यात्रेमधे सहाय्यक होण्याऐवजी तेच एक मोठा अडथळा बनून बसतात. ध्यान हा जो अंतर्जागरणाचा मार्ग आहे, तो आपल्या अविरत आत्मनिरीक्षणातूनच पुढे जात असतो. अशा प्रकारचे जागरूक अवधानच माणसाला मनाच्या सीमेपलीकडील वैश्र्विक प्रज्ञेच्या साम्राज्यात घेऊन जात असतं. आपल्या मनाच्या स्वकेंद्रित व्यवहारांना अलिप्तपणे पाहून निरपेक्ष प्रबुद्धतेत त्यांचं परिवर्तन करण्याची कला आत्मसात केल्यावरच, माणूस त्या नवआयामी अस्तित्वाचं रहस्य आणि त्याचं सौंदर्य यांची अनुभूती घेण्यास सुसज्ज होऊन उभा राहील.
माणसासमोरचं अंतिम आव्हान हे तो स्वतःच, तो अहं हेच असतं. त्याला जाणून घेण्याच्या या आव्हानातच आपल्या गर्भित सामर्थ्याचा शोध घेण्याची त्याची संधी दडलेली असते. आपण स्वतःला हरवण्यातूनच जीवनाचा सर्वोच्च सन्मान-कालाच्या बंधनापासून स्वतंत्रता म्हणजेच जीवनमुक्ती- तो सन्मान गवसण्याचं भाग्य त्याला लाभतं!
अनेक पौर्वात्य आध्यात्मिक गुरूंनी अमेरिकेतील वास्तव्य स्वीकारलं आहे. पण फारच मोजक्या गुरूंनी दादांसारखं, अगदी थेट आणि अत्यंत समर्पक अशा ग्रंथाचं संपादन केलं आहे. मनाच्या चाललेल्या खेळांचे अत्यंत समयोचित व भेदक असं चित्रण आणि त्याचबरोबर त्या खेळांच्या बंधनातून सुटून अलिप्त राहण्याचा सहजसोपा तरीही मर्मभेदक असा मार्ग त्यांनी मनाच्या पलीकडे (Beyond The Mind) या पुस्तकात मांडला आहे.
- दी माउंटन पाथ, रमण महर्षी आश्रम
बहुतांशी लोक ज्या पारंपरिक दृष्टिकोनातून अभ्यास करतात, त्याच्या पलीकडे घेऊन जाणारी अशी प्रत्यक्ष स्वानुभूत ऊर्जा दादांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे. आता ह्या क्षणी समजेल अशी – नंतर कधी तरी, पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वर्षी नव्हे, तर तत्क्षणी येणारी समज ते देत आहेत.
-डॉन केऑन, इन्डीपेन्डण्ट जर्नल, अमेरिका